विचार नाविन्य

  हेतु

  प्रकटीकरण

  श्रद्धांजली

  संमिश्र विचार

  अविस्मरणीय व्यक्ती

  संपर्क

 

माझ्या जीवनात मला भेटलेल्या काही व्यक्ति मनाच्या तळाशी मी जपून ठेवल्या आहेत. माझ्या आजवरच्या अनुभवातून मी मला सामान्यातील असामान्य भेटले आहेत जे बड्या प्रतिष्ठित लोकात नाही भेटले. यात महात्मा गांधींना मी खूप मानतो. त्यांनी ज्याचे आचरण केले त्याचीच लोकांना शिकवण दिली. लहानपणी मी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी, सुभाषचंद्र बोस यांना खूप मानत होतो. पण जसा वयाने वाढत गेलो तसा गांधीजींना मानू लागलो. जेव्हा मला जाणवले, शस्राशिवाय तत्वांसाठी लढण्यास खूप धैर्य लागते तेव्हा गांधीजींचा भक्त झालो. थोर व्यक्तिंमध्ये लाल बहादूर शास्री हे हि एक आहेत. मला हे कळत नाही काँग्रेस पार्टी त्यांची का पूजा करीत नाही! ते ख-या अर्थाने गांधीजींचे अनुयायी होते. ज्या तिस-या माणसाचे मी कौतुक करतो तो म्हणजे प्रसिध्द बैडमिंटनपटू पुल्लैला गोपीचंद होय. तो खरा खेळाडू आहे. त्याने कोका कोलाची जाहिरात नाकारण्याचे सबळ कारण देताना म्हटले की या शीतपेयात खेळाडूंसाठी किंवा मुलांसाठी काहीही चांगले आढळते नाही. आपले बरेचसे खेळाडू व्हिस्की, सिगारेट, कोको कोला. थम्सअप सारखी प्रदूषित शीतपेये यांची जाहिरात करून भरपूर कमाई करतात. सर्व देश या खेळाडूंसाठी कठोर कायदे का करीत नाहीत? सरकारने रूग्णांना दिलासा देणारे कायदे बनविले आहेत तर ते डाँक्टर विरूध्द दावा लावू शकतात. मग या ब्रँडमास्टरविरूध्दही तसा दावा का लागला जात नाही? ब्रँडमास्टरवर चुकीची जाहिरात केल्याबद्दल आरोपपत्र का दाखल होत नाही?

मला माझ्या शालेय जीवनात खूप चांगले शिक्षक लाभले. आमच्यावेळी शिक्षकांचा रस चांगले विद्यार्थि घडविण्यात होता, पैसे कमवण्यात नव्हता. मी नुकताच पुण्यात आलो होतो आणि श्री. दिवाणसरांना माझी इंग्रजीची शिकवणी घेण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी शिकवणी घेत नसल्याचे सांगितले. मला खूप वाईत वाटले. आठवीला ते फ्रेंच शिकवीत होते. त्यांनी ती भाषा खूप रंजक करून शिकविली.  त्यांनी फ्रेंच लोक खाण्याचे खूप शौकिन असल्याचे सांगितले आणि फ्रेंच पाककृतीचे इतके बहारदार वर्णन केले की आमच्या तोंडाला पाणि सुटले. ते आम्हाला इंग्रजीचे फ्रेंच भाषांतर करावयास सांगत. आमच्या चुका आम्हाला सांगून त्या दुरुस्त करावयास भाग पाडत. चूका दुरुस्त केल्यावर ते नेहमी म्हणत,' हे पहा! तुम्हाला सर्व येते परंतु तुम्ही मन लावून शिकत नाही.' त्यांनी मन लावून अभ्यास करायला शिकविले. आम्ही एस.एस.सी.त असताना त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना जादा तास घेऊन, कोणताही मोबदला न घेता शिकविले. मी त्यांच्या आठवणीने नतमस्तक होतो.

दुसरे शिक्षक श्री. वाँचमेकर, आमचे प्राचार्य मला आठवतात. एकदा माझ्यापेश्रा एका ताकवान मुलाने मला मारले तेव्हा त्याची तक्रार करण्यास मी त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले, 'मी त्या मुलाला शिक्षा करू शकतो पण तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तुला पुन्हा पुन्हा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागेल. तुझे प्रश्न तू सोडवायला शीक! त्यांनी मला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकविले. मी विम्याचा प्रशिक्षक या नात्याने त्यांना भेटलो. ते म्हणाले विक्रेता म्हणून तुम्ही तुमचा माल विकत नसून तुमचे व्यक्तिमत्व विकत असता. तुमच्या मालामधून तुमचे व्यक्तिमत्व समोर आले पाहिजे. त्यांनाही मी सलाम करतो.

आणखी एक चावीवाला मला आठवतो, जो कुलपाच्या चाव्या बनवायचा. एकदा मी आणि माझा मित्र सिनेमाला गेलो. दुर्देवाने माझ्या मित्राची चावी हरवली. आम्ही दोन चावीवाल्यांना गाठले. ते चार आण्यात चावी बनवतो म्हणाले, पण बनवू शकले नाहीत. आम्ही आणखी एक चावीवाला गाठला. तो मराठी पुस्तक वाचत होता. त्याने चावी बनवण्याचे सहा आणे सांगितले. आम्ही आधीच्या दोन चावीवाल्यांचा दाखला देऊन चार आण्यात बनविण्यास सांगितले. परंतु तो सहा आण्यांवर अडून राहीला. परवडत असेल तर बनवतो, नाही तर जाऊ दे असे म्हणून तो पुस्तक वाचू लागला. आम्ही होकार देताच, तीन मिनिटात त्याने चावी बनविली. माझा मित्राने खुष होऊन आठ आणे देऊ केले. परंतु त्याने सहाच आणे घेतले. आम्ही थक्क होऊन त्याला विचारले की तो असा कसा धंदा करतो! माझ्याजवळ माझ्या धंद्याचे कसब आहे मी कमी वा जास्त मोबदला कधीच घेत नाही योग्यच दर आकारतो असे सांगून तो पुन्हा पुस्तक वाचू लागला. मला त्याच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले. धंद्यात कमी वा जास्त दर आकारू नये हे मी त्याच्याकडून शिकलो.

१९७४-७५ च्या आसपास मी मुंबईला गेलो. मी ठाणा क्रिक ब्रिजवरून जात होतो. ठाणे मुंबईला जोडणा-या ठाणा क्रिक ब्रिजवर काम करणा-या काँन्ट्रँक्टरकडे मी सुपरवाइजर म्हणून काम बघत होतो. भूतकाळातील काही घटनांचा मागोवा घेताना मला वयस्क, पागोटे घातलेला, करड्या रंगाच्या कोटातील, कोल्हापुरी चप्पल घालून वावरणारा मुकादम आठवतो. प्रसन्न व्यक्तिमत्वाचा, प्रेमळ मुकादम मला खूप आवडायचा. तो त्याच्या मजुरांवर कधीही वैतागायचा किंवा ओरडायचा नाही. त्याच्या शोधक नजरेतून रस्त्यातील एकही खड्डा चुकायचा नाही. त्याच्या देखरेखेखाली सर्व खड्डे खडी पसवरून, रस्त्याबरोबर व्यवस्थित भरले जायचे. छोट्यातला छोटा खड्डा पण व्यवस्थित बुजवला जायचा. तो काम अगदी चोख आणि मनापासून करायचा. आज मला हा मुकादम राहून राहून आठवत आहे. एकदा तो माझ्यासमोर येऊन म्हणाला की या शनिवारपासून त्याला मजुरीत वाढ दिली नाही तर तो कानगारांना घेऊन काम सोडून जाईल. मी बाँसशी बोलून काय ते सांगतो असे सांगितले. सौदा फिसकटला आणि तो काम सोडून गेला. तीन महिन्यांनी तो परत काम मागण्यांसाठी त्याच्या मजुरांसह आला. मी दर वाडवून मिळणार नसल्याचे सांगितले. तेव्हा तो म्हणाला की त्याने कामाबद्दल विचारले आहे, दर वाढीबद्दल नाही. मला आश्चर्य वाटले.  तो पुन्हा परत का आला याबद्दल मी त्याला विचारले. तो म्हणाला तो त्याच्या कामगारांना मधल्या काळात चांगले काम देऊ शकला नाही. प्रश्न त्याच्या एकट्याच्या पोटाचा असता तर तो आला नसता, परंतु त्याच्या कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता म्हणून त्याला परत यावे लागले. तो त्याच्या कामगारांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करीत होता. त्यांना ऊपाशी ठेवणे त्याला शक्य नव्हते. मला लाज वाटली. मी त्याला दर वाढवून देण्याचे आश्र्वासन दिले. माझ्या बाँसशी भांडून मी त्याला दर वाढवून दिला. आपल्या कामगारांचा सांभाळ कसा करायचा हे मी त्याच्याकडून शिकलो. आपले नेते असे नेतृत्व करू शकतील काय? 

अजून एक व्यक्तिमत्व मला आठवते, ज्याच्याबद्दल माझ्या लाँजवरच्या खोलीतल्या सोबत्याने मला सांगितले आहे. तो म्हणाला एक दिवस त्याला खूप एकटेपणा जाणवत होता आणि तो त्या भरात वेश्येकडे गेला. त्याला खूप ओशाळल्यासारखे वाटत होते कारण यापुर्वी तो कधीही या वाटेला गेला नव्हता. त्याने त्या वेश्येला मनमोकळेपणाने सांगितले की तो मुंबईचा नसल्याने त्याला एकाकीपणा जाणवत होता. कुणाशी तरी बोलायचे होते म्हणून तो तिच्याकडे आला होता. तो त्याच्या बाजूला बसली. पंधरा मिनिटे तो तिच्याशी बोलला. त्याला खूप हलके वाटले. त्याने तिच्या सहानभुतीचा मोबदला म्हणून तिला पैसे देऊ केले. परंतु मी फक्त देहविक्रयाचे पैसे घेते, दुस-याशी माणुसकीने वागण्याचे पैसे घेत नाही असे सांगून पैसे घेन्याचे नाकारले. हे गरजू आणि गरीब वेश्येचे बोलणे ऐकून तो थक्क झाला. वेश्येच्या रूपात सुध्दा देवी भेटते असे तो म्हणाला. माझाही तीला सलाम! 

श्री. देवन हे प्रसिध्द कथकली डान्सर आहेत. मी त्यांचा एक किस्सा आपणास सांगू इच्छितो. मी माझ्या मित्रासोबत कोचीनला गेलो होतो. तेथे वर्तमानपत्रात श्री. देवन कथकली नृत्यातील सूक्ष्म भेद समजावून सांगणार असून तो नृत्य प्रकार प्रस्तुत करणार असल्याचे वाचले. शो भरगच्च असेल असे समजवून मी आणि माझा मित्र हाँटेलातून लवकर बाहेर पडलो आणि थिएटरवर पोहचलो. तिथे कोणीच नव्हते. आम्ही शोची तिकिटेही काढली होती. एक वयस्क गृहस्थ आणि स्त्री खुर्ची टाकून समोर बसले होते. मी त्यांना देवेन यांचा कथकली प्रोग्रँम कुठे आहे असे विचारले. तेच देवेन होते. त्यांनी स्वतःची आणि बाजूला बसलेल्या पत्नीची ओळख करून दिली. प्रेक्षक नसल्याने ते शो करणार आहेत की नाही असे विचारताच ते म्हणाले, प्रेक्षक असोत वा नसोत कार्यक्रम वेळेवर होईल. ते म्हणाले, मी कथकलीच्या प्रसारासाठी कार्यक्रम करतो. मी लोकांना हा नृत्यप्रकार, यातील मुद्राभिनय आणि रंगभूषा, वेषभूषा याबद्दल माहिती देतो. कार्यक्रमाची घंटा वाजली. त्यांच्या एका विद्यार्थिनीचा मेकअप मेकअपमन द्वारा रंगमंचावर दाखविला जात होता. रंगभूषेचे महत्व देवन यांनी सांगितले. नंतर कोणत्याही मेकअपविना रंगमंचावर येऊन विविध मुद्राभिनय, डोळ्यांचे हावभाव दाखविले. वेगवेगळे भाव जसे राग, असूया, प्रेम, दुःख वगैरे त्यांनी या अभिनयातून व्यक्त केले. नंतर मेकअपसह या भाव भावनात रंग भरला. त्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी कथकली नृत्य सादर केले. आधीच्या प्रात्याक्षित आणि त्यांनी पुरवलेल्या माहितीमुळे आम्हाला या नृत्याचा खूप आस्वाद घेता आला. राष्ट्रिय पुरस्कार विजेते असूनही त्यांना अजिबात अहंकार वा अभिमान नव्हता. दोन श्रोत्यासाठीही त्यांनी तितक्याच उत्कटतेने कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमानंतर ते आणि त्यांच्या सहका-यांसमवेत आम्ही फोटो काढून घेतला.

या थोर कलाकार आणि त्याच्या सहका-यांना माझा मानाचा मुजरा!

 


संकेत स्थळाचे विकासक नोवेसिस टेक्नाँलाँजिज प्रा. लि. पुणे